घर व नोकरीचं आमिष दाखवून १ कोटींची फसवणूक
बाळकडू वृत्तसेवा सातारा : सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाण्यात बेबीताई सोळेकर यांनी तक्रार दाखल केली होती की, कल्याण येथील टावरीपाडा परिसरात राहणारा प्रशांत गणपत बेडेकर उर्फ अरविंद सोनटक्के याने त्यांच्यासह इतर १६ जणांना मुंबईतील म्हाडा गृहसंकुलात स्वस्त दरात घर मिळवून देतो अशी बतावणी केली होती. तसेच रिझर्व बँकेत क्लार्क पदावर नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले होते. घर मिळवून देण्याचे व नोकरी लावण्याचे आमिष दाखवून या भामट्याने १६ जणांना तब्बल १ कोटी रुपये आपल्या बँकेच्या खात्यात भरायला भाग पाडले होते. त्यानंतर कुठलेही घर मिळवून न देता तसेच नोकरी न लावता या भामट्याने सगळ्यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी साताऱ्यातील शिरवळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांनी संशयित आरोपीची माहिती ठाणे पोलिसांना पाठवला होता. त्यानुसार या घटनेचा समांतर कोटींची फसवणूक तपास ठाणे खंडणी विरोधी पथक करीत होते. दरम्यान, हा ठगसेन कल्याण खडकपाडा परिसरात लपून असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यास खडकपाडा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच या भामट्याने राज्यभरात अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे देखील पोलीस तपासातून समोर आले आहे. त्याच्यावर नागपूर येथील रानाप्रताप पोलीस स्टेशन, नाशिक मधील अंबड, मुंबईतील समतानगर, पुण्यातील समर्थ आणि मावळ पोलीस स्टेशन, नंदरबार शहर, आणि औरंगाबाद आदी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. हा भामटा मासिक व वृत्तपत्रातील जाहिरातींमधून ग्राहकांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क करत असे व त्यांना स्वस्त घराचे तसेच नोकरीचे आमिष दाखवत असे. त्यानंतर तो आपल्या जाळ्यात अडकलल्य सावजकडून पैसे उकळत असे.