घर घेताना एका महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष होतं. हा मुद्दा असतो मजल्याचा. घर कोणत्या मजल्यावर असावे, कोणता मजला योग्य असे प्रश्न सहज पडतात. ऐकीव माहितीवर किंवा मिळालेल्या सल्ल्यांवर निर्णय घेतला जातो. पण नेमकी गरज ओळखून तळमजला की वरचा मजला हा निर्णय घ्यायला हवा. प्रत्येक मजल्याचे काही फायदे-तोटे आहेत. त्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. घरात ज्येष्ठ नागरिक असतील तर साहजिक तळमजल्यावरील घराचा पर्याय निवडला जातो. पण आजच्या काळात इमारतींना लिफ्टची सोय दिल्याने वरचा मजला चालू शकतो. मोठया सोसायट्या, अपार्टमेंट्समध्ये बाहेर बाग तसेच इतर सोयी केलेल्या असतात. तळमजल्यावरील घरातून बाहेरचे छान दृश्य दिसू शकते. लहान मुलांच्या दृष्टीनेही तळ मजला योग्य ठरतो. सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून घर हाकेच्या अंतरावर असतं.येणे-जाणे सोयीचे ठरते. फारशा पायऱ्या नसल्याने, खाली कुणी राहात नसल्याने लहान मुलं मोकळेपणाने खेळू शकतात. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं असतील तर तळ मजल्याला प्राधान्य द्यावे. असे असले तरी सतत ये-जा सुरू असल्याने निवांतपणा मिळत नाही. घर लिफ्ट किंवा प्रवेशद्वारासमोर असेल तर सारखी वर्दळ सुरू राहते. तळमजल्यावर सूर्यप्रकाश, हवा फारशी नसते. हवा खेळती राहण्यासाठी वरचा मजला योग्य ठरतो. वरच्या मजल्यावरील घरात निवांतपणा थोडा जास्त असतो. भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा यामुळे ताजेतवाने वाटते. बाल्कनी असेल तर फारच छान. तळमजल्यापेक्षा वरचा मजला जास्त सुरक्षित असतो. व्यायाम म्हणून जिने चढता आणि उतरता येतात. वरच्या मजल्यावर घर घेतल्यास खाली कुणीतरी राहतंय याचे भान ठेवावे लागते. उघडी बाल्कनी छान वाटत असली तरी लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती घातक ठरू शकते. लिफ्ट बंद पडल्यास किंवा लाईट गेल्यास जिने चढून जावे लागते. त्यात वरच्या मजल्यांवर पाणी गळतीची समस्या उद्भवू शकते. या सोबत उन्हाळ्यात वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना उकाड्याचा जास्त त्रास होतो. या साऱ्या बाबींचा नीट विचार करून मजला निवडणे योग्य ठरते.
कोणता मजला निवडावा?